आयुष्यात संयम आणि श्रम ही यशाची गुरकिल्ली आहे.
प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात यश मिळविण्याची अभिलाषा मनात बाळगून असते. परंतु असे यश मिळविण्यास आवश्यक असलेली इच्छाशक्ती आणि कुवत किंवा पात्रता तिच्यात सुप्त स्वरूपात आहे याविषयी ती अनभिज्ञ असेल, तर ती जीवनामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. म्हणून अशी सुप्त शक्ती ओळखणे आणि तिचा विकास करणे, हा यशस्वी होण्याचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. जीवनातले आपले इप्सित काहीही असो; ते साध्य करण्यासाठी प्रथमतः आपल्यातील कुवत व तिच्या मर्यादा जाणून घेणे अतिशय आवश्यक असते. अशी जाणीव म्हणजे असमर्थता नव्हे, याचेही भान ठेवले पाहिजे; कारण प्रत्येक व्यक्तीत अंगभूत शक्ती असतात. त्यांचे स्वरूप व मर्यादा समजून घेतल्या की यशोमार्गावरील ते पहिले पाऊल ठरते.काही व्यक्तींना जीवनात संपत्ती, सत्ता, प्रतिष्ठा सहज सुलभतेने प्राप्त होतात. त्या प्राप्त होण्यासाठी त्यांच्या मनात इच्छाही निर्माण झालेली नसते किंवा त्या दिशेने त्यांनी प्रयत्नही केलेले नसतात. पण असे सहज सुलभतेने मिळालेले यश क्षणभंगुर होण्याचा धोका असतो. ते यश पचविण्यासाठी आणि त्याचा योग्य उपयोग करण्यासाठी मनाची आणि बुद्धीची तयारी झालेली नस...


